शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा झंझावात, काँग्रेसही आघाडीवर, भाजप स्ट्राईक रेट नुसार तिसर्‍या क्रमांकावर

Foto
मुंबई  : मागील काही निवडणुकीच्या निकालात बहुमताच्या आकड्यांपेक्षा स्ट्राईक रेटला भारी महत्त्व आले होते. स्ट्राईक रेट हा गेल्या काही निवडणुकीतील परवलीचा शब्द ठरला आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवी मतदारसंघातील निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. तीन पदवीधर मतदारसंघ भाजपच्या हातून गेले. तर पुणे काबीज करण्यात भाजपला तर अमरावतीत शिंदे सेनेला शिक्षक मतदारसंघात यश आले. या हाराकिरीवरून महायुतीतील मित्रपक्षात रणकंदन सुरू असतानाच स्ट्राईक रेटनेही भाजपची झोप उडवली आहे. तर महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीचे निकाल एकदाचे समोर आले. दोन दिवसांपासून अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. आता निकाल लागल्यावर जीव टांगणीला लागला आहे. तर निवडणुकीत विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीने सरस कामगिरी केली आहे. महायुतीला शिक्षक मतदारसंघात सूर गवसला खरा पण पदवीधर त्यांच्याविरोधात गेल्याचे चित्र आहे. या निकालात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ठसठशीत यश मिळवले आहे. त्यानंतर काँग्रेस आणि भाजप तिसर्‍या क्रमांकावर फेकली गेली आहे.

शरद पवार राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट १०० टक्के
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा या निवडणुकीतील स्ट्राईक रेट १०० टक्के दिसून आला. मराठवाडा पदवीधर आणि पुणे पदवीधर मतदारसंघात या पक्षाने चमकदार कामगिरी बजावली. मराठवाड्यात १८ वर्षानंतर पदवीधरांनी नवीन आमदार निवडला. यापूर्वी सतीश चव्हाण हेच समीकरण झाले होते. डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या रुपाने नवीन आमदार विधान परिषदेत जाणार आहे. तर पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव यांच्या रुपाने तरूण चेहरा पक्षाने कमावला.

एकच जागा, पण काँग्रेसने किल्ल्याला सुरूंग लावला
काँग्रेसला या निवडणुकीत एकच जागा मिळवता आली. पण या एकाच जागेने भाजपला जिव्हारी लावणारा पराभव दाखवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातच विकेट पाडण्यात काँग्रेस यशस्वी ठरली. अभिजीत वंजारी यांच्यासह काँग्रेस नेत्यांचे कसब दिसून आले. सत्ताधार्‍यांच्या हाती यंत्रणा असतानाही इथं सपाटून मार खावा लागल्याने त्याचे शल्य लवकर जाणार नाही. या निवडणुकीत काँग्रेसचा स्ट्राईक रेट ५० टक्के इतका राहिला आहे.

भाजपचा स्ट्राईक रेट ३३.३३ टक्के
सत्ताधारी आणि मोठ्या भावाच्या भूमिकेतील भाजपला नागपूरच्या पराभवाने अस्वस्थ केले आहे. पुण्यातील शिक्षक मतदारसंघातील विजय यामुळे फिक्का झाला. या निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट ३३.३३ टक्के इतकाच राहिला. शिवसेना शिंदे गटाला अमरावती शिक्षक मतदारसंघ राखता आला. पण महाविकास आघाडीतील उद्धव सेनेला खातंही उघडता आलं नाही.